उत्तुंग यश मिळवलेल्या नापास मुलाची गोष्ट !

न्यूयॉर्कचे एक छोटे उपनगर. बार्बरा अँकरमन आणि मायकेल कार्प हे एक साधं मध्यमवर्गीय जोडपं तिथे राही. छोटी अपार्टमेण्ट. बार्बरा अप्पर वेस्ट साइड मॅनहॅटनमधल्या कॉलहॉन स्कूलमध्ये सायन्स टीचर आणि मायकेल टीव्ही/फिल्म प्रॉडक्शनमध्ये गुंतलेला. या दोघांना दोन मुलं. त्यातला थोरला डेव्हिड लहानपणापासूनच एकलकोंडा. शाळा संपवून घरी आला की उरलेली अख्खी दुपार आणि संध्याकाळ घरात बसून काढी. खेळायला सोडा, मित्रांशी फोनवर बोलायला, टीव्ही पाहायलासुद्धा आपल्या छोट्या बेडरूम बाहेर म्हणून पडत नसे.
हळूहळू बार्बराला काळजी वाटायला लागली. कसं होणार आपल्या या मुलाचं? अमेरिकेत म्हणजे, मुलानं लोटून घेतलेलं त्याच्या बेडरूमचं दार (त्याला न विचारता) उघडून आत शिरणं खुद्द त्याच्या आई-वडिलांसाठीही निषिद्ध! - शेवटी एके दिवशी बार्बराने लेकाला विचारलं, ‘हे असे तासन्तास आत बसून तू काय करतोस?’ तो म्हणाला, ‘लॅपटॉप!’ तेव्हा तिला काय ते कळलं. डेव्हिड रात्रंदिवस त्याच्या लॅपटॉपमध्ये बुडूनच गेला होता जणू. खरंतर त्याला शाळेत जाणंसुद्धा नको वाटे. लहानपणी बर्थडे गिफ्ट म्हणून मिळालेल्या लॅपटॉपशी एकट्यानं झगडून त्यानं बर्‍याच गोष्टी स्वत:च आत्मसात केल्या होत्या. जे समजतं आहे, आवडतं आहे, त्याचा हात धरून पुढे जात राहावं असं त्याला वाटू लागलं होतं. शाळेतल्या भाषा, गणित आणि शास्त्राच्या अभ्यासात त्याचा जीव रमेनासा झाला होता. बार्बरा आपल्या लेकावर लक्ष ठेवून होती. टीनएजर झाल्यावर डेव्हिड जरा खुलला. त्याला मुली आवडायला लागल्या. तो त्यांच्याबरोबर बाहेर जाऊ लागला. पण घरी आला की खोलीचं दार बंद! आणि आतला दिवा रात्रभर जळत! ‘टोस्टीटोज’ नावाच्या प्रसिद्ध अमेरिकन बिस्किटांचे पुड्यावर पुडे संपवीत डेव्हिड पहाटेपर्यंत आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला चिकटलेला असे. बार्बराला आपल्या लेकाची तडफड समजत होती. शेवटी एका सकाळी डेव्हिडनं बार्बराला सांगितलं, ‘मॉम, मला शाळेत जाऊन वेळ वाया नाही घालवायचा. मी उद्यापासून जाणार नाही.’ बार्बरानं विचारलं, ‘मग काय करशील?’ तो म्हणाला, ‘मला आवडतं ते काम करीन.’ आपण आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय घेतो आहोत, हे तेव्हा बार्बराला ठाऊक असणं शक्य नव्हतं, पण तिनं आपल्या मुलावर विश्‍वास टाकायचं ठरवलं. ती म्हणाली, ‘नको जाऊस शाळेत. तू घरीच कर अभ्यास.’ वयाच्या पंधराव्या वर्षी डेव्हिड ड्रॉप-आऊट झाला, आणि त्यानंतर दोनच वर्षांंनी बार्बरा आणि मायकेल यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एकटीनं दोन टीनएजर मुलांच्या संगोपनाची कसरत बार्बरानं हिमतीनं सुरू केली. तोवर डेव्हिड आसपासच्या छोट्या कंपन्यांच्या वेबसाइट्स डिझाइन करून द्यायला लागला होता. तो एकटाच बाहेर जाई, काम मिळवी आणि एकट्यानंच ते पूर्ण करी. तो झपाटून गेल्यासारखा त्याचं स्वप्न जगू लागला होता. एवढंच फक्त की, त्या स्वप्नात ‘शाळा आणि इतर मुलांसारखा अभ्यास’ या गोष्टींना जागा नव्हती. काय चाललं आहे, हे बार्बराला कळत नव्हतं, पण आपला मुलगा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे आणि इतरांचं अनुकरण करण्यापेक्षा आपण आपला नवा रस्ता शोधण्यात तो बुडालेला आहे, हे तिला ठाऊक होतं. डेव्हिडनं घरी अभ्यास करून शाळेच्या परीक्षा देणं (होम स्कूलिंग) नाकारलं आणि तो छोट्या (इंटरनेट) स्टार्ट अप कंपन्यांमध्ये कामाला जाऊ लागला. एके दिवशी त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो म्हणाला, ‘मी जपानला चाललो.’ ’ बार्बरा म्हणाली, ‘तुझ्या आवडीचं काम आहे ना, जरूर जा!’ साठवलेले सगळे पैसे खर्चून त्यानं टोकियोमध्ये एका खोलीचं आगाऊ भाडं भरून टाकलं आणि सॅक पाठीवर मारून निघाला. हा मुलगा घरूनच काम करत असे, त्यामुळे तो कॅलिफोर्नियात नसून जपानमध्ये आहे, हे तो ज्या कंपनीत काम करत होता, त्यांना तब्बल तीन महिन्यांनी कळलं. भरपूर अनुभव कमावून आणि साठवलेले सगळे पैसे खर्च करून डेव्हिड परत आला, तेव्हा त्याच्या खिशात एकूण पंधरा कंपन्यांच्या ऑफर्स होत्या. त्याचं काम सुरू झालं, बार्बरा सांगते, रोज रात्री घरी येताना हा आमच्या अपार्टमेण्टच्या गेटपासूनच जोरात ओरडायला सुरुवात करी, ‘मॉमऽऽऽ यू नो व्हॉट हॅपण्ड टूडे?????’..मग डिनर टेबलवर त्याची बडबड सुरू होई. तो काय म्हणतो, हे मला काहीही कळत नसे, पण तो त्याच्या आवडीचं काहीतरी करतो आहे, हे दिसत असे त्याच्या चेहर्‍यावर आणि तेवढं पुरेसं होतं माझ्यासाठी.’ पालकांसाठी इंटरनेटवर मेसेज बोर्ड लाँच करणार्‍या अर्बनबेबी नावाच्या स्टार्ट अपमध्ये डेव्हिडनं भलतीच चमक दाखवली. त्या बदल्यात पगारासोबत त्याला कंपनीचे काही शेअर्स मिळाले. ही कंपनी टेकओव्हर केली गेली तेव्हा जवळचे शेअर्स विकून डेव्हिडनंपैसा उभा केला आणि आपली स्वत:ची स्वतंत्र कंपनी सुरू केली. त्या कंपनीच्या अनेक प्रॉडक्टमधले नावारूपाला आलेले एक म्हणजे ‘टम्बलर’ ही ब्लॉग्ज होस्ट करणारी साइट! हे चालू होतं तोवर पंचविशी उलटली तरी ग्रॅज्युएशन सोडा, साधं हायस्कूलही पूर्ण न केलेल्या आपल्या मुलाचं बरं चाललं आहे, इतपत खात्री बार्बराला वाटत होती. अन पंधरा दिवसांपूर्वी डेव्हिड आनंदानं उड्या मारत घरी आला आणि ओरडून म्हणाला, ‘मॉमऽऽऽ यू नो, व्हॉट हॅपण्ड टूडे?????’ बातमी होतीच तशी! - याहू या बलदंड कंपनीनं डेव्हिडचे टम्बलर हे अत्यंत लोकप्रिय पोर्टल विकत घेण्यासाठी तब्बल १.१ बिलियन अमेरिकन डॉलर्स मोजले होते आणि त्यातले २५0 मिलियन डॉलर्स व्यक्तिगत डेव्हिडच्या खिशात पडले होते !!!!!

विजयी मुद्रेने ऑफिसमधून बाहेर पडणारा डेव्हिड 

ही बातमी जाहीर होताच डेव्हिड आणि त्याची मॉम एकदम प्रकाशात आले. ’आय अँम द प्राऊडेस्ट मॉम टूडे’ - न्यूयॉर्क टाईम्स या वर्तमानपत्राला मुलाखत देताना बार्बराला याहून वेगळं काही सुचतच नव्हतं,’’मी काही केलं नाही त्याच्यासाठी.. फक्त त्याला स्वत:ला जे करायचं होतं ते त्याला करू दिलं. त्याच्या वाटेत आले नाही, हेच काय ते माझे कर्तृत्व- बार्बरा पुन:पुन्हा हेच सांगते आहे सगळ्या प्रसारमाध्यमांना. तिचा डेव्हिड सव्वीसावे वर्ष ओलांडता ओलांडता केवळ मिलिऑनर बनला आहे एवढंच नव्हे, तर त्याच्या व्यावसायिक आयुष्यात त्यानं जगाला थक्क करून टाकणारं यशही मिळवलं आहे.
हे नेमकं कसं झालं, हे बार्बराला अजूनही उमगत नाही....!